महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच ठेवायचे की ७ जणांच्या खंडपीठाकडे सोपवायचे यावर आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस सलग सुरु असलेल्या सुनावणीतील युक्तीवाद, प्रतिवाद संपला आहे. यासाठी खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला होता.
सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नबाम रेबिया, पाच की सात जणांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवायचे की नाही यावर खंडपीठाचे सदस्य चर्चा करतील. यानंतर पुढील निर्णय देतील, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले.
सात जजेसकडे हे प्रकरण गेले नाही तर एक ते दोन महिने याचिकेवरील निकालासाठी लागू शकतात. जर हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे गेले तर निकालासाठी वर्ष लागू शकते, असे ते म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे आणि दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे.
संघवी यांनी ठाकरे गटाकडून प्रतिवादाला सुरुवात केली होती. नबाम रेबिया प्रकरणानुसार निर्णय होऊ नये असे विरोधक म्हणत आहेत. परंतू तेच युक्तीवादात याचे दाखले देत आहेत, असे पलटवार संघवी यांनी केला आहे.