राज्यातील सत्तासंघर्षावरील सलग सुनावणीचा आज दुसरा दिवस होता. यावेळी शिंदे गटाचे वकील हरीष साळवे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट ठेवले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला प्रत्युत्तर देताना साळवे यांनी एकच मार्ग असल्याचे सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देता नये होता. त्यांनी राजीनामा का दिला? त्य़ांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ होता. त्यामुळे ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थ उरत नाही. त्यामुळे १६ आमदारांमुळे सरकार पडले हे सिद्ध होत नाही. आमची याचिका १६ आमदारांची होती. इतर २२ आमदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
तसेच आता जर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अवैध ठरवला गेला तर या चर्चेला अर्थ असेल, असे सांगत राजीनामा दिला नसता तरच काही प्रश्न उपस्थित झाले असते, असे साळवे म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. अजय चौधरी यांचं गटनेतेपद हे बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला फक्त 14 आमदार उपस्थित होते, यामुळे बहुमत नव्हते, असे साळवे म्हणाले.
16 आमदारांना अपात्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. परंतू साळवेंनी या आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांकडे नव्हता, असे सांगत सिब्बलांचा बचाव खोडून काढला.