उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेनी काढून घेतला आहे. यामुळे ठाकरे गट शिवसेनाहीन झाला आहे. अशातच आज ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी करतानाच आता शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयावर असल्याचे म्हटले आहे.
ना पक्ष, ना निवडणूक चिन्ह अशी अवस्था झालेल्या उद्धव यांच्याकडे आता काय ते ठाकरे हे नावच आहे. शिवसेना नसली तरी हाडाचे शिवसैनिक आहेत. याच शिवसैनिकांच्या जोरावर ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी करत आहेत. असे असताना पहिल्या सभेची वेळ आणि ठिकाणही ठरले आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण गेल्यानंतरची पहिली सभा थोड्याच दिवसांत होणार आहे. उद्धव ठाकरे येत्या ५ मार्चला खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केले. खेडमध्ये पहिली सभा घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात अश्रू गाळणाऱ्या रामदास कदमांच्या मतदारसंघातून शिंदे गटाविरोधात प्रचार सुरु केला जाणार आहे. या सभेत ठाकरे रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
आपल्या हातातून आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुढची रणनिती आखण्याआधी पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरे कुटुंब भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र येत्या काळात पिंजून काढणार आहेत. यासाठीचं प्लानिंग केलं जात आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी नेत्यांची एक टीम तयार केली जात आहे. यात आपले गड मजबूत ठेवण्याचं काम ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. पक्ष सध्या ज्या परिस्थितीचा सामना करतोय अशा काळात निवडणुकीला खंबीरपणे सामोरं जायचं असेल तर गाव-खेड्यापासून पक्ष मजबूत करावा लागेल अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे महत्वाचे नेते महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं समजतं.