ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. ३० - राज्य सरकार जर मस्तीत वागत असेल तर पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधल्या प्रचारसभेत यांनी दिली आहे. या सभेत पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य सरकारकडून म्हणजे मुख्यत: भाजपाकडून सरकारी यंत्रणेमार्फत अन्याय होतोय असं सांगत मंत्रिपदाचा व पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला, जो ठाकरेंनी स्वीकारला नाही.
भाजपाच्या नेत्यांची धुणीभांडी करू नका असे पोलीसांना व आयुक्तांना उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, जर तुम्हाला भाजपाची धुणीभांडी करायची असतिल तर त्यासाठी खाकी उतरवा आणि त्यांच्या घरी जा नी धुणीभांडी करा असे सांगितले.
जर, निवडणुका जिंकता येत नाहीत हे कळल्यामुळे शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्या जात असतिल तर राज्य सरकारला तडीपार करू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जो कायदा सर्वसामान्यांना आहे तोच मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना लागू असल्याचे सांगताना, ही काय आणिबाणी आहे का असा सवाल ठाकरेंनी विचारला. त्यापुढे जात इंदिरा गांधीना लोकांनी उचलून आपटले, त्यापुढे तुमची काय औकात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.