राहुल नार्वेकरांकडून उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, चूक लक्षात येताच म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 02:13 PM2024-01-10T14:13:34+5:302024-01-10T14:14:31+5:30
Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख चुकून भावी मुख्यमंत्री असा केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली. मात्र त्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या आपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आपात्रता प्रकरणाचा निकाल सुनावणार आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आलं आहे. तसेच सर्वांच्या नजरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वळलेल्या आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राहुल नार्वेकर हे या निकालांबाबत संकेतही देत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख चुकून भावी मुख्यमंत्री असा केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली. मात्र त्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घेतलेल्या भेटीवर टीका केली होती. या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष हे लवाद आहेत आणि मुख्यमंत्री आरोपी आहेत. एक न्यायाधीश आरोपीला भेटू शकतो का? मला या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग होत असल्याची शंका येतेय, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. हे आरोप फेटाळताना राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचं विधान म्हणजे घटनेचा अपमान असल्याचा दावा केला होता. तसेच जयंत पाटील आणि अनिल देसाई यांच्याशी झालेल्या भेटीचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरेंचे आरोप हे निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचाही आरोप नार्वेकर यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर बोलताना राहुल नार्वेकर यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असाही केला. मात्र लगेचच आपली चूक दुरुस्तही केली. मला वाटते की, जी व्यक्ती भावी मुख्यमंत्री आहे. नाही.. भावी नाही, काय म्हणतात ते माजी. माजी मुख्यमंत्री राहिली आहे. त्यांना विधानसभा अध्यक्षांचं काम आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती असली पाहिजे, असे राहुल नार्वेकर म्हणाले.