कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Byelection) सर्व पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांच्यासाठी कोल्हापूरात येऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
'भाजप म्हणजे हिंदुत्व नाही...'आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केले. "आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपवाले म्हणतात की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोला"भाजपने देशात एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, " असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
'आम्ही पाठित वार करत नाही'ते पुढे म्हणाले की, "कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणारच. मर्दाने मर्दासारखे लढलं पाहिजे, ते कोल्हापूरकरांकडून शिकलं पाहिजे. काल फडणवीस येऊन गेले, भाजपकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे काही सांगण्यासारखे नाही मग धार्मिक मुद्द्यांव पुढे केले जातात. 2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही?, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना समोरुन वार करते, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.