मुंबई – ज्या ज्या कंपन्यांना लस वितरणाची परवानगी मिळेल त्यांच्याशी राज्य सरकार संवाद साधत आहे. सध्या २ कंपन्यांच उत्पादनाची परवानगी आहे. ४५ वयोगटावरील लसीकरणासाठी डोसचा साठा नियमित पणाने केंद्राने कराव्या. राज्याची तयारी १२ कोटी डोस देण्याची आहे. १८ लाख या महिन्यात डोस मिळतील सांगितलं आहे. ३ लाख पोहचले आहे. पण थांबता येणार नाही. लसीकरणाचा पहिला डोस देऊन नागरिकांना सुरक्षित करायला लागेल. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उद्यापासून जसे डोस येतील तसे देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.(CM Uddhav Thackery on Corona Vaccine)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लसीचा साठा येईल तसं लसीकरण होईल. अँपवर नोंदणी करून जिथे केंद्र असतील तिथे लस दिली जाईल. लस उत्पादन मर्यादित स्वरुपात आहे. जून-जुर्लैपर्यंत लसीचा साठा वाढेल. पण तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. केंद्राबाहेर झालेली झुंबड पाहून मन सुन्न होतं. लसीकरणाचा साठा जसा येईल तसा दिला जाईल. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिली आहे. ती पेलण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्याची तयारी आहे. सुरुवातीला गोंधळ उडतोय. ही लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होतंय का याची भीती वाटते. हात जोडून नम्र विनंती आहे. तुर्त ३ लाख लसी आल्या आहेत. त्याचे वितरण रुग्णसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात केले आहे. गुरुवारी एका दिवसात ५ लाख डोस दिले आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कुठेही गोंधळ करू नका. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ कोटी नागरिकांसाठी १२ कोटी लसींच्या डोसची गरज आहे. ते एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून दिला तर लसीकरणाच्या माध्यमातून कोविडला मात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
राज्यातील ऑक्सिजनची स्थिती
आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन इतका आहे.त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.
"मी कुठेही कधीही राजकारण आणणार नाही, पण..."; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा