भाईंदर, दि. 21 - मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मीरा-भाईंदरमधील मतदारांनी नरेंद्र मोदींच्या माफीया हटाव आणि मुख्यमंत्र्यांच्या विकासला मत दिल आहे.
मुंबईत 84 जागा जिंकल्यानंतरही शिवसेनेची माफीयागिरी संपली नव्हती. मीरा भाईंदरचा निकाल हा शिवसेनेसाठी सणसणीत चपराक आहे. शिवसेना नेत्यांच्या अहंकाराला मतदारांनी जागा दाखवली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले. मीरा-भाईंदरच्या निकालानंतर तरी बांद्रा सुप्रीमो वास्तव स्वीकारुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणार का ? असे टि्वट सोमय्या यांनी केले आहे.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. भाजपानं आतापर्यंत 54 जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भाईंदर पालिकेत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना 17, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवणं शक्य होणार आहे.
मीरा- भाईंदर महापालिकेच्या 94 जागांपैकी 83 जागांचे निकाल हाती आले आहेत. मात्र हाती आलेल्या आकड्यांनुसार पुन्हा एकदा भाजपाच मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मोदी लाट इथेही कायम राहिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीनं 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती.
पहिल्या अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागले होते. भाईंदर महापालिकेच्या 2012च्या महापालिका निवडणुकीत भाजपा 32, शिवसेना 15, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 26, बहुजन विकास आघाडी 3, एका अपक्षाचा विजय झाला होता.