मुंबईः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझानं चंदूमामांशी बातचीत केली आहे. उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, असा आशीर्वादही चंदूमामांनी दिला आहे. उद्धवला आम्ही लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलं आहे. आज जर मीनाताई आणि बाळासाहेब असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता, साहेबांचं उद्धव ठाकरेंवर जास्त प्रेम होतं. उद्धवच्या जन्मानंतरच मार्मिक आणि शिवसेनेचा जन्म झाला. उद्धवला या सर्व राजकीय वातावरणाची बालपणापासूनच सवय झाली होती. उद्धव शाळेत असताना बालमोहनचे प्राध्यापक त्यावेळी घरी(मातोश्रीवर) यायचे, पण उद्धवनी साहेबांचा मुलगा असल्याचं कधीच दाखवलं नाही, असंही चंदूमामा म्हणाले आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे फोटोग्राफीचं कौशल्य होतं, ते उद्धव ठाकरेंनी आत्मसाद केलं.तर बाळासाहेबांकडून राज हे चित्रकला शिकले. कॅमेरा आणि लेन्स यामध्येच उद्धव ठाकरे जास्त गुंतायचा. कुठलीही गोष्ट मनावर घेतली, ती साध्य करूनच दाखवायचा. साहेबांच्या दोन पावलं तो पुढेच गेला. साहेब गेल्यानंतरही त्यानं मुंबई महापालिकेतली शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवली. उद्धव स्वतःहून राजकारणात आला. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मनमिळावू आहे, बंदूक घेऊन शिकारी करण्याची आवड होती, अशा अनेक गोष्टी चंदूमामांनी सांगितल्या आहेत.
Maharashtra CM: उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, चंदूमामांनी दिले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:42 AM