औरंगाबाद - ज्यादिवशी पक्षप्रमुखपदी नियुक्ती झाली त्याच दिवशी पक्षाचं प्रमुखपद जातंय हा दैवी चमत्कार आहे. ज्यादिवशी नेमणूक त्यादिवशी बरखास्त. संजय राऊत आता कितीही बोलले आमच्या मनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहतील तरीही जे गेलंय ते सत्य आहे. ३० तारखेला ज्यादिवशी निवडणूक आयोगाचा निकाल लागेल तेव्हा १०० टक्के उद्धव ठाकरेंना धक्का बसणार आहे असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात प्रत्येक वेळी ठाकरे गटाने तारीख वाढवून घेतली. कालावधी वाढवला तो त्यांच्यामुळेच. कायदेशीर यांचा पराभव होणार आहे हे त्यांना माहिती आहे. मी भविष्य पाहत नाही पण कायदेशीर ज्या बाबी आहेत त्यावर बोलतोय. निकाल त्यांच्याविरोधात जाणार हे पक्कं माहिती आहे. जेव्हा निकाल ठाकरेंविरोधात जाईल तेव्हा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे पक्षप्रवेश व्हायला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेना प्रमुखांचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या हाती कमान असलेली शिवसेना आहे. ३० तारखेला निकाल लागल्यावर १०० टक्के धक्का बसणार आहे. सुनावणी आम्ही ऐकली, कागदपत्रे पाहिलीय. जनतेत जाऊन चिन्ह घेऊ अशी भाषा ते त्यासाठीच करतायेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही आणि गेलो तर दुकान बंद करेन हा व्हिडिओ ट्विटवरून शेअर का केला नाही? ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं बाळासाहेबांचा छळवाद केला त्यांच्यासोबत हे गेले. शिवसेनाप्रमुखांच्या त्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करा असा टोला संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला.
दरम्यान, बाळासाहेबांच्या मांडीवरही आदित्य ठाकरे बसले नाहीत. नातू असले म्हणून अक्कल येते असे नाही. राजकारण गेले खड्ड्यात, माझ्या आजोबाचं चित्र विधानभवनात लागतेय. समृद्धी महामार्गाला लागलेय. आजोबांच्या नावानं दवाखाना होतोय त्याचा अभिमान बाळगा. बाळासाहेबांची पुण्याई म्हणून तुम्हाला विचारलं जातेय. बोलताना भान बाळगलं पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला मोठे केले. त्यांच्या नावावर हे जगतायेत. बाळासाहेबांचे नाव दिल्याने वाईट वाटतेय तसं जाहीर करा. आम्ही शिवसेनाप्रमुखांसाठी काहीही करू असं सांगत शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.