मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सभापतींकडे राजीनामा दिलेला नव्हता. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा राजीनामा न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. विधान परिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ कमी होऊ नये यासाठी शिवसेना पक्ष कार्यकारिणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सभापतिपदाच्या निवडणुकीत संख्याबळ महत्त्वाचे
विधान परिषदेचे सभापतिपद रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक लागली तर महाविकास आघाडीकडे जास्त संख्याबळ असावे या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. विधान परिषदेत सध्या भाजपचे २४ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे शिवसेना १२, काँग्रेस १० आणि राष्ट्रवादी १० असे ३२ चे संख्याबळ आहे.
७ अपक्ष आमदार असून, यातील ३ जण महाविकास आघाडीसोबत आहेत. राज्यपाल नियुक्त रिक्त असलेल्या १२ जागा भरण्यापूर्वी सभापतिपदाची निवडणूक लागली तर सध्याच्या संख्याबळाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकेल. मात्र शिंदे-भाजप युतीकडून या १२ जागा भरल्या गेल्या आणि त्यानंतर ही निवडणूक लागली तर त्याचा फायदा शिंदे-भाजप गटाला होणार आहे.