'...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:47 PM2020-01-12T15:47:17+5:302020-01-12T15:50:16+5:30

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा स्वपक्षीय मंत्र्यांना घरचा आहेर

uddhav thackeray will resign as cm if congress ncp leaders not improve their behavior says yashwantrao gadakh | '...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'

'...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'

googlenewsNext

अहमदनगर: राज्यातलं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार किती काळ चालेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास सत्तेतल्या तिन्ही पक्षांना आहे. तर हे सरकार पाडण्याची गरज नसून ते आपोआप कोसळेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी नीट वागली नाहीत, तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असं मत गडाख यांनी अहमदनगरमध्ये व्यक्त केलं. बंगले, खातेवाटपावरुन नाराज होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनादेखील त्यांनी घरचा आहेर दिला आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुरबुरी सुरुच राहिल्यास उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील. कारण तो राजकारणी माणूस नाही. मी त्यांना जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. तो कलावंत माणूस आहे. शब्द पाळणारा माणूस आहे, असं यशवंतराव गडाख म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक मंत्री रोज रुसतो. कधी या पक्षात कुरबुरी सुरू असतात, तर कधी त्या पक्षात नाराजीनाट्य घडत असतं. बंगला नीट मिळाला नाही, खातं नीट मिळालं नाही, यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू असते. हे कुठेतरी थांबायला हवं, असं गडाख म्हणाले. 

उद्धव ठाकरेंचं कौतुक करणाऱ्या गडाख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना वर्तणूक सुधारण्याचा सल्ला दिला. 'उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नसता, तर काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवरच राहिला असता. त्यांना केवळ तोंडाची हवा सोडत राहावं लागलं असतं. पण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यानं तुम्ही मंत्री झालात. तरीही तुमचं हाच बंगला पाहिजे. तेच खातं पाहिजे, अशा कुरबुरी सुरू आहेत. आता तरी सुधारा', अशा शब्दांत गडाख यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपण आपल्या भावना व्यक्त केल्याचंदेखील गडाख यांनी सांगितलं. 

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणानं वागायला हवं, असं गडाख म्हणाले. 'उद्धव ठाकरे शब्द पाळणारा माणूस आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ द्यायचं असेल, तर दोन्ही काँग्रेसनं भांडणं कमी करायला हवीत. जरा शहाणपणानं वागायला हवं. म्हणजे हे सरकार चालेल,' असं गडाख यांनी म्हटलं. 'राज्यात आता ग्रामीण भागातलं सरकार आलेलं आहे. ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायला तुम्हाला कशाला बंगले पाहिजे? कशाला कार्यालयं पाहिजेत? राहता कशाला मुंबईतल्या बंगल्यांमध्ये?', असे प्रश्न गडाख यांनी उपस्थित केले. मंत्र्यांनी लोकांमध्ये राहायचं असतं, हे कुणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. ग्रामीण भागातलं सरकार असल्यानं ते चालावं अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी आणि बहुजनांची इच्छा असल्याचंदेखील ते म्हणाले. 
 

Web Title: uddhav thackeray will resign as cm if congress ncp leaders not improve their behavior says yashwantrao gadakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.