दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात तू तू-मै मै झाल्याची चर्चा असतानाच शनिवारी दुपारी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बैठक पार पडली. यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी विषय महत्वाचा आणि गंभीर असल्याचे सूतोवाच केले आहे.
मविआचे जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. परंतू एकूणच प्रकरण जागावाटपावरूनच असल्याचे समजते आहे. ''काल साधारण दहा तास बैठक झाली. आज सकाळी माझी आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार आहोत'', असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.
आम्हाला असे वाटते की महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात संविधान बचावची मुव्हमेंट आहे ती यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेने ज्या अर्थी मातोश्रीवर तातडीची बैठक घेत आहे, त्या अर्थी हा विषय महत्त्वाचा आणि गंभीर आहे, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.