उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादीच वाचली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 01:09 PM2022-11-09T13:09:23+5:302022-11-09T13:23:17+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे,
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे व पवारही या यात्रेला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे कोणते नेते भारत जोडोमध्ये सहभागी होणार आहेत, याची माहिती दिली आहे. नांदेडमध्ये पाच दिवस ही यात्रा असणार आहे. तेथून ती पुढच्या प्रवासाला निघणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे ११ नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी या यात्रेत सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.
यावरून उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे. तर शरद पवारही प्रकृतीमुळे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह
स्वागतासाठी राज्यभरातून देगलूर शहरात कार्यकर्त्यांचे जथे दाखल झाले होते. कुणी चारचाकी, तर कुणी दुचाकीने देगलूर गाठत होते. दिवसभर विविध मार्गांवरून रॅली काढण्यात येत होत्या. हातात तिरंगा ध्वज आणि विविध घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. राहुल गांधी यांना पाहण्याची उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. दुपारपासून हजारो कार्यकर्ते पदयात्रा मार्गावर प्रतीक्षा करीत होते. शहरात २ किमी अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. शहरात जागोजागी स्वागताचे होर्डिंग्ज लागले आहेत. अनेकांनी राहुल यांचे कटआऊट आणि ‘वेलकम राहुल गांधी’ असे लिहिलेले बॅनर्स हाती घेतले होते.