उद्धव ठाकरे तुम्हाला काहीच वाटत नाही का, ज्यांच्याविरोधात बाळासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य वेचले त्या पंज्याला मतदान करण्यासाठी चालला आहात. काँग्रेसने आमच्यावर केसेस टाकल्या त्यांना मतदान टाकणार का, असा बोचरा सवाल राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
तेव्हा संजय राऊत नावाचे बारदान नव्हते, आम्ही होतो, सातपूरचे लोक. तिकडे हात वेगळे, पाय वेगळे, शरीर वेगवेगळ्या पक्षाचे आहे. इथे टॉप टू बॉटम एकच मॉडेल आहे. या सरकारची नियत चांगली आहे. मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही. नाशिकला पट्टी लावल्याशिवाय जाता येत नव्हते. आता फाईव्ह स्टार रेल्वे स्टेशन होतेय. रस्ते टकाटक झाले आहेत, असे पाटील म्हणाले.
याचबरोबर आता फटाक्यांचा आवाज आला तरी यात आमचा हात नाही हे सांगावे लागत आहे. असा दमदार पंतप्रधान आहे. ही शिवसेना संजय राऊत यांना कधी समजली, त्यांच्यावर एक तरी केस आहे का, असा सवाल करत दिनकर पाटील आणि करंजकर यांनीच खासदारकीसाठी हेमंत गोडसे यांचे नाव सुचविले होते, असा दावा केला.
आमचा मुख्यमंत्री साधा माणूस, रिक्षावाला आहे. गरिबाने मुख्यमंत्री व्हावे हे सहन झाले नाही. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून ठरले होते. बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु ते झाले नाहीत. इकडे ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला गाडी चालवायला बसायला दिले. यांना काय काम चालते हे माहिती नव्हते. गढूळ लोकांनी तुम्हाला वेडे केले आहे. सोनिया गांधी, फारूक अब्दुल्लांच्या बाजुला नेऊन बसविले आहे, अशी टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे.