कल्याण - गेल्या महिनाभरापासून शिवसेनेत घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट असे दोन गट पक्षात पडले आहेत. दोन्ही गटातील समर्थकांमध्ये मीडियापासून सोशल मीडियापर्यंत जोरदार वादविवाद होत असून, काही वाद हाणामारीपर्यंत जात आहेत. दरम्यान कल्याणमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला असून, हा हल्ला शिंदे समर्थकांनी केल्याचा आरोप केला जात आहेत. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षवर्धन पालांडे यांच्याशी फोनवरून संवास साधला असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन पालांडे यांच्यात फोनवरून झालेलं संभाषण आता समोर आलं आहे. यावेळी त्यांच्यात असा संवाद झाला. ’जय महाराष्ट्र, कसे आहात तुम्ही?’’काही नाही साहेब, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. कसं काम करतो, जास्त पुढे पुढे करतो, तुला बघतो म्हणत हल्ला केला.’’आता जास्त बोलू नका. व्यवस्थित आहात ना?’’हो साहेब, व्यवस्थित आहे.’ ’आपण त्याचा वचपा घेऊ नंतर. त्याची काळजी करू नका. आधी व्यवस्थित बरे व्हा. मी पण येईन तिकडे.’ ‘मला तुमचे आशीर्वाद पुरेसे आहे. जय महाराष्ट्र’
कल्याण पूर्वेतील संतोषी माता रस्त्याने गाडीतून जात असताना हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. तलवार व लोखंडी रॉडने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पालांडे यांच्यावरील हल्ला एकनाथ शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र महेश गायकवाड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही घटना दुर्देवी असून या घटनेशी माझा काही संबंध नाही, असे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.