ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली. अशाप्रकारे अचानक नोटा रद्द करणं चुकीचं असल्याचं यावेळी उद्धव म्हणाले.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्रास होत आहे, नोटा बदलण्याची मुदत सरकारने वाढवायला हवी अशी मागणी त्यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या ठिकाणी सर्वात जास्त काळा पैसा आहे त्या स्वीस बॅंकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी करणार अशी विचारणाही त्यांनी केली, शिवाय या निर्णयाचा नेत्यांना त्रास होत नसून जनतेला जास्त त्रास होत आहे, जनतेनं सर्जिकल स्ट्राईक केलं तर जड जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-
- दिवाळीला ज्या लक्ष्मीचे पुजन केले आता ती लक्ष्मीच राहिली नाही
- मोदींनी मन की बात करण्याऐवजी धन की बात केली पण जन की बात केली नाही
- देशातून काळा पैसा हद्दपार करावा या योजनेला माझा विरोध नाही.
- मोदींनी सर्जीकल स्ट्राईक केला होता. ते धाडसी पाऊल होते. पण आता काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी जो धाडसी निर्णय घेतला आहे तो आता अंगाशी येतोय असं वाटतंय
- मोरारजी देसाई यांनी देखील असा निर्णय घेतला होता पण त्याचे काय झाले आपल्याला माहिती आहे.
- मुलुंड - ठाण्यात बँकेच्या बाहेरील रांगेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण?
- लग्न रद्द झाली आहेत
- रूग्णालयात अडचणी येत आहेत
- आता घराघरात कॅमेरे लावणार का?
- लोकांच्या बँक लॉकर्सवर नजर ठेवणार
- आज सामन्य नागरिकांना त्रास होतोय त्या सामान्य नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे हे विसरू नका
- जनता पुढील निवडणुकीत धडा शिकवेल
- जनता सर्जिकल स्ट्राईक करेल हे लक्षात ठेवा
- पैसे भरताना एका क्षणात तो व्यक्ती वारला याची जबाबदारी कोण घेणार
- 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा
- सामान्य माणसाला त्रास देण्याऐवजी जिथे काळ्या पैशाचा उगम आहे तिथे कारवाई करा
- सामान्य नागरिकांना होणारा त्रास बंद झालाच पाहिजे.
- ज्या जनतेच्या भल्यासाठी तुम्ही काम करताय असं दाखवताय त्या जनतेला त्रास का देताय?
- हा त्रास संपला नाही तर जनता जनतेचा अधिकार वापरेल
- ठाण्यात बँकेत पैसे भरताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या मृत्यूला ज्या व्यक्तीने निर्णय जाहिर केला तो व्यक्ती जबाबदार