मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक जनतेसह सत्ताधारी भाजपा वगळता उर्वरित सर्व पक्षांनी विरोध दर्शविला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले. नाणार प्रकल्प लादणार नाही असे त्यांनी सांगितले असतानाही हा प्रकल्प लादला गेला. तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. स्थानिकांचा विरोध असेल हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून त्यांच्या शब्दाला दिल्लीत काडीचीही किंमत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 78 टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. त्यानंतर ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याचबरोबर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणार प्रकल्पाबाबतच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत, अशी माहिती दिली होती.
दुसरीकडे, आज दिल्लीत धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नाणार रिफायनरी प्रकल्प भारतासह महाराष्ट्राच्या हिताचा आहे. या प्रकल्पामुळे 3 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे. महाराष्ट्रातील रोजगार आणि औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याचबरोबर, या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. यासंदर्भात धर्मेंद्र प्रधान यांना विचारले असता, मला विश्वास आहे, सर्वसहमतीने हळूहळू सर्वजण या प्रकल्पाचे समर्थन करतील, असे त्यांनी सांगितले.
काल (दि.11) सौदी अरेबियाची अरामको कंपनी आणि रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लि. यांच्यात नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंबंधी करार झाला. या प्रस्तावित रिफायनरी मध्ये अरामको कंपनीला 50 % भागीदार म्हणून घेण्यात आले.