मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची भेट घेत आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर तेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असेही चर्चा होत आहे. मात्र, याबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मतभेत पाहायला मिळत आहे. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, बाजारात नाही तुरी अन् नवरा नवरीला मारी, अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. तशीच अवस्था महाविकास आघाडीत शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची झाली आहे. यांना बहुमताचा पत्ता नाही, प्रत्येकाला १०० जागा लढवायला मिळतील की नाही हे देखील माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरून भांडत आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. कारण जनता महायुतीसोबत आहे. लोकसभेत नशिबाने पन्नास हजाराहून कमी मताधिक्याने काही जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. त्यामुळे हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. जनता विकासासोबत उभी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या महायुतीलाच ते पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून देतील, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, मागील तीन दिवस दिल्लीत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या. तीन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. तीन दिवस जात्यावरचे दळण सुरू होते. मात्र यातून रस आलाच नाही. महाविकास आघाडी कोरडे चिपाट आहे. तीन दिवसात दळण केले, पण पीठ आलेच नाही. कारण मविआने फक्त दगड टाकले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तीन दिवस केलेली हुजरेगिरी होती. पण त्याला देखील यश आलेले नाही, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.