उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का; महामंडळांवरील नियुक्त्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 10:32 AM2019-12-12T10:32:56+5:302019-12-12T10:33:49+5:30
नियुक्त्या रद्द झाल्या असल्या तरी, सिद्धीविनायक मंदीर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, पंढरपूर मंदीर, शिर्डी संस्थान येथील नियुक्त्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसातच आपला पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या भाजप सरकारच्या काळातील निर्णय मोडून काढण्याचा धडाका लावला आहे. आधी कारशेडमधील वृक्षतोडीला स्थगिती आणि बुलेट ट्रेन संदर्भात घेतलेली भूमिका भाजपला धक्का देणार होती. त्यातच आता भाजपने महामंडळावर केलेल्या नियुक्त्याही उद्धव ठाकरे यांच्याकडून रद्द करण्यात आल्या आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील महामंडळावर अनेक नेत्यांची वर्णी भाजपकडून लावण्यात आली होती. या नियुक्त्यांमुळे नाराजांना खूष कऱण्याचा भाजपचा मानस होता. नियुक्त्या मिळालेल्या नेत्यांनाही पुढील पाच वर्षे चिंता नसल्याचे वाटत होते. अर्थात भाजपची सत्ता पुन्हा येणार या विचाराने हे नेते निश्चित झाले होते.
दरम्यान भाजप-शिवसेना यांची कित्येक वर्षांची मैत्री तुटल्यानंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे समिकरण उदयास आले. त्यामुळे प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भाजपला विरोधात बसावं लागत आहे. याचा फटका महामंडळांवरील नियुक्त झालेल्या नेत्यांनाही बसत आहे. या नियुक्त्या रद्द झाल्या असल्या तरी, सिद्धीविनायक मंदीर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, पंढरपूर मंदीर, शिर्डी संस्थान येथील नियुक्त्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे.