शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सरकारकडून सध्या सुरू असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही खिल्ली उडवली. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.
हिंगोली येथील जाहीर सभेमध्ये शिंदे सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शेतकरी हवालदील आहे आणि सरकार फिरतंय. इथे सभा सुरू असताना शेजारी एक कार्यक्रम होता. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी. हे थापा मारणारं सरकार आहे. थापाच थापा, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, इथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तुमच्या आसपास कुणी असतील तर त्यांना विचारा अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे मिळाले होते का. आता दुष्काळ आहे. किती पेरण्या केल्या आहेत तुम्ही. मला कळतच नाही आहे की, या शेतकऱ्याचा गुन्हा काय आहे. सरकार बदलल्यानंतर एक अस्मानी संकट समजू शकतो. पण या गद्दारांची जी सुलतानी आली आहे, या सुलतानीचं संकट हे त्याही पेक्षा मोठं आहे.
एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. जे जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, हे इथे बसलेले आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इथे नसला तरी सांगतो. सरकारने या विषयात मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. तसेच जो ग्राहक आहे त्याला परवडणाऱ्या दरात तो देण्याचं कामही सरकारनं केलं पाहिजे. पण सरकार काही बघायला तयार नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.