Bharatshet Gogawale : (Marathi News) मुंबई : राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडले. यानंतर या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने संमती दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. मराठा आरक्षण संदर्भात विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार, नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात याचा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भरतशेठ गोगावले हे फोनद्वारे आरक्षण दिल्ल्याबद्दल आपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा कण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देत आहेत.
भरतशेठ गोगावले फोनवर म्हणाले की, "१०-१० हजाराच्या दोन फटाक्याच्या माळा लावल्या पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत. या माळांमध्ये सुतळी बॉम्ब लावा. सर्वांना फोन करुन सर्व मराठ्यांना बोलावून घ्या. खरे मराठे असेल तर तिथे जमा व्हा, असं त्यांना आवाहन करा. जो मराठा नसेल तो येणार नाही, असं सांगा. सर्व कार्यकर्त्यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. आपले सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सर्व तिथं हजर पाहिजेत. पेढे वाटा. तुमच्या आनंदोत्सवाचे फोटो इकडे यायला पाहिजे. साहेबांना दाखवायचं आहे, महाड विधानसभा मतदारसंघात कसा जल्लोश झाला आहे."
मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूरदरम्यान, आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विशेष अधिवेशनादरम्यान सभागृहात मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक मांडत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, मराठा आरक्षण विधेयकाबद्दल माहिती दिल्यानंतर या विधेयकाला आपण एकमताने मान्यता देऊ, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. त्यानंतर विरोधकांनी संमती दिल्याने सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.