ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी १५१, भाजपासाठी ११९ तर मित्रपक्षांसाठी १८ जागा असा नवा प्रस्ताव शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. युती टिकवण्यासाठी हा आमचा शेवटचा प्रयत्न आहे. या पलीकडे ताणून धरल्यास आमचा नाईलाज होईल असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिका-यांची बैठक पार पडली असून या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. 'महिनाभरानंतर राज्यात भगवी दिवाळी साजरी केली जाईल' असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्ता शिवसेनेचीच असा इशारा भाजपला दिला आहे. भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असतानाही युतीमध्ये वाद व्हायचा. पण त्यावेळी कोणीच ऐवढे ताणून धरले नाही. सत्तेसाठी युती झाली नसून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर युती झाली. तुम्ही देशात राज्य करा पण राज्यात आम्हाला त्रास देऊ नका. शिवसेनेला कस्पटासमान लेखणार असाल तर शिवसेनेचे वाघ तयार आहे असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला. युती टिकावी ही आमचीही इच्छा आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही भाजपला चार - पाच जागा द्यायला आहोत असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. उमेदवारी दिली तर एकाला न्याय मिळेल पण सत्ता आल्यास सर्वांनाच न्याय मिळेल असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले. राज्यात कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायची असून बाळासाहेबांचे एकही स्वप्न अधुरे ठेवणार नाही असे भावनिक विधानही त्यांनी केले.
भाषणाच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंनी युतीवरुन भाजपला चिमटे काढले. जनतेने महायुतीसाठी सत्तेचे ताट वाढून ठेवले आहे. मात्र युतीमध्ये प्रचाराऐवजी जागावाटपावरुन घासाघीस सुरु आहे. हा कर्मदरिद्रीपणा करु नका असे जनतेला वाटत असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवसेनेच्या नेत्यांनी युतीविषयी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ओळखूनच निर्णय घेऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
युती राहिली तर २२० पेक्षा जास्त जागा मिळतील असे भाजप नेते सांगतात. मग २२० जागांसाठी भाजप दोन - पाच जागा सोडू शकत नाही का असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना लगावला. कार्यक्रमात उपस्थित पदाधिका-यांनीही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी घोषणाबाजीही केली. याप्रसंगी 'विकासाच इंद्रधनुष्य' ही चित्रफीतही दाखवण्यात आली. आता शिवसेनेचा हा प्रस्ताव भाजप मान्य करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आघाडीला नव्हे तर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा
शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएतील घटकपक्ष असूनही युपीएच्या बाजूने मतदान केले अशी आठवण भाजप नेत्यांनी करुन दिली होती. यावरही उद्धव ठाकरेंनी भाजपला उत्तर दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला नव्हे तर महाराष्ट्रातील महिलेने राष्ट्रपतीपदावर विराजमान व्हावे यासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. याचा आम्हाला आजही अभिमान आहे असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
बाळासाहेबांनीच नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला
गुजरात दंगलीनंतर देशभरात मोदी हटावचा नारा सुरु झाला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना नरेंद्र मोदींविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र हिंदूत्वासाठी लढणारा नेता असे सांगत बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी करुन दिली.