एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे बहुतांशी आमदार घेत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. ठाकरेंनी वाटले तर राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले आहेत. शिंदे यांच्यावर कारवाई करताना ठाकरेंनी त्यांच्याकडून विधान सभेतील गटनेते पद काढून घेत त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली. मात्र, ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. यावर आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे.
Eknath Shinde : ठाकरेंच्या हातून शिवसेना, धनुष्य बाणही जाणार? एकनाथ शिंदे दावा करण्याच्या तयारीत
कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने प्रतोदांची नेमणूक करायची असते. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे, ते पत्र मी स्वीकारले असल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. सुनील प्रभूंनी दिलेल्या सहीचं पत्र मी स्विकारले आहे. शिंदे यांच्याकडून दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा अद्याप आपल्याकडे आलेला नाही. तो करायचा की नाही हा प्रश्न त्यांचा आहे. माझ्याकडे दावा केला तर घटनेप्रमाणे त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
माझ्याकडे जे शिंदे यांनी आमदारांचे पत्र पाठविले आहे, त्यात सह्यांचा घोळ आहे. शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या सहीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपली सही ही इंग्रजीत असते, परंतू पत्रावर मराठीत असल्याने ती ग्राह्य धरू नये, असे कळविले आहे. यावर चौकशी होईल, यानंतर निर्णय घेतला जाईल असेही झिरवाळ म्हणाले. तसेच अपक्ष आमदारही अशा पत्रावर सह्या करू शकत नाहीत, यामुळे हे पत्र शंकेस पात्र आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.