गेल्या काही महिन्यांपासून मानेच्या दुखण्यावरील शस्त्रक्रियेमुळे बेडरेस्ट घेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रीय झाले आहेत. यावर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारली आहे, हे ऐकून मला आनंद झाल्याचे म्हटले आहे. याचबरोबर एमपीएससीबाबत एक मागणी देखील केली आहे.
जवळपास साडे तीन हजार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे पडळकर म्हणाले. संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. पण उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकले नाहीत. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे पडळकर म्हणाले.
अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा. मला सरकारला हे सांगायचं की, एमपीएससीने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे हे, उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.