जळगाव - उद्धव ठाकरेंची सभा पाचोऱ्यात होणार असून या सभेआधीच जळगावातील वातावरण पेटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पाटील समर्थक शिवसैनिक संतापले आहेत. आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय, ते आम्ही स्वीकारतो. हजारोंच्या संख्येने सभेत उपस्थित राहू. बघूया काय मते मांडतात अशा शब्दात शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी इशारा दिला आहे.
सरिता माळी म्हणाल्या की, अक्षयतृतीया हा महिलांचा रणरागिणींचा सण असतो म्हणून आम्ही गप्प बसलो. इथं येऊन आमच्या नेत्याबद्दल अपमानास्पद बोलले जातंय ते आता सहन करणार नाही. गुलाबराव पाटलांना तुम्ही चॅलेंज करताय, येऊ आम्ही, महिलांचे व्हिडिओ मॉर्फ करून व्हिडिओ व्हायरल करतात, घाणेरडे कमेंट करतात ती तुमची शिवसेना, बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचाराने पुढे जाणारी आमची शिवसेना आहे. गरिमेवर आले तर बापालाही सोडत नाही असा विषय या शिवसेनेचा आहे. आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय त्यामुळे हजारोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं त्यांनी म्हटलं.
तसेच कुणाला त्रास देण्याचं, सभा भंग करण्याचा उद्धेश नाही. पण संजय राऊत कायम गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याला टार्गेट करतात. हा त्यांचा वैयक्तिक रोष आहे का? हे माहिती नाही. आम्हालाही पुढे काय घडणार हे माहिती आहे. आम्ही कफन बांधून घेतलंय त्यामुळे सगळी भीती संपून जाते हे कळते असंही सरिता माळी यांनी सांगितले.
गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवारसंजय राऊत कुठल्याही आंदोलनात नव्हते. त्यांना शिवसेनेचे आंदोलन कसे असते हे माहिती नाही. दगडं मारून लोकांची सभा बंद करणारी आम्ही आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे. तर ही पक्षाची सभा आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित केले आहे. जळगावात ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचे स्वागत होणार आहे. मी इथं आलोय तुम्ही घुसून दाखवा, हे सगळे पळालेले उंदिर आहेत असं संजय राऊत म्हणाले होते.