रत्नागिरी - भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मला दम दिलाय, मी त्यांना घाबरतो असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हातच जोडले. चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावर पत्रकारांनी जाधव यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जाधव यांनी भाजपा नेत्यांना चांगलेच फटकारले आहे.
चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केलेल्या स्तुतीवर भास्कर जाधव यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमदार भास्कर जाधव म्हणाले की, अरे बाबा, त्यांच्याबद्दल विचारू नका. त्यांनी मला दम दिलाय माझ्या नादाला लागू नका. त्यामुळे त्यांच्या नादाला लागताना मी घाबरतो असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
...मग भाजपाला पुढे पुढे करण्याचं कारण काय? लव्ह जिहादविरोधात हिंदू जनजागृती मोर्चा त्याला कुणाचाही विरोध नाही. परंतु भाजपाचं अशा गोष्टीत नाक खुपसणं ही जुनी गोष्ट. कोणाला तरी पुढे ढकलणे, मतांचे राजकारण करणे, तेढ निर्माण करायचं हे भाजपाचं राजकारण. या मोर्चात शिवसेनेला दोष देण्याचं कारण काय? हिंदू जनजागरण समितीने काढलेल्या मोर्चात भाजपानं पुढे पुढे करण्याचं कारण काय? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी विचारला आहे.
ठाकरे म्हणजे हिंदुत्व हेच स्पष्ट झालेदेशात काँग्रेसची राजवट असताना मुस्लीम म्हणायचे इस्लाम खतरे मे है, आज हिंदुत्ववाद्यांची राजवट देशात आहेत. केंद्र-राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहेत म्हणतात आणि संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे. मोदी-शाह यांच्या सरकारचं हे अपयश आहे. बरे झाले, भाजपाने या मोर्चानिमित्त आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. हे किती तकलादू आहेत हे समजलं. त्यामुळे ठाकरे म्हणजे हिंदुत्व हे स्पष्ट झाले असंही भास्कर जाधव यांनी सांगितले.
भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीबोलणारे किती फडतूस आहेत ते सातत्याने मी बोललोय. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा काय अधिकार. बाळासाहेब-उद्धव ठाकरे जोपर्यंत यांच्या पाठिशी उभे नाहीत तोवर यांना असुरक्षित वाटतं. त्यामुळे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करायची. पण यातून भाजपाचा कमकुवतपणा दिसतोय. हिंदुत्व किती नकली, टाकाऊ आहे हे दिसते. भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीत ते ठाकरेच करू शकतात हे भाजपानं मान्य केले आहे असा टोला जाधवांनी लगावला.
तर बागेश्वर महाराजने संत तुकाराम यांच्याबद्दल केलेल्या विधानावर भाजपानं तोंड उघडलं नाही. महाराष्ट्रातील युग पुरुष, साधु संत, पुढाऱ्यांचा अपमान करणे हे भाजपाची कार्यकक्षा दिसतेय. त्यामुळे सोयीचं राजकारण सुरू आहे. संत तुकारामांचा इतका मोठा अपमान झाला त्यावर मौन बाळगून भाजपाची सगळी ढोंग उघडी पडतायेत असा आरोप जाधव यांनी केला.