मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवर अद्याप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी त्यांनी अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला विचारण्याची भूमिका घेतली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. यातच संजय राऊतांच्या टीकेमुळे आणखी भर पडली आहे.
शिवसेना नेते अरविंद सावंत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ठाकरे यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व द्यावे, अशी मागणी करणारा मंत्रिमंडळाचा ठराव राज्यपालांकडे गेला आहे. अद्याप ठाकरे यांची सहा महिन्यांची मुदत संपण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्या काळात जर त्यांनी कोणाशी चर्चा केली असेल तर त्यात फार न पडता, त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. त्यासाठी पडद्याआड संवाद चालू ठेवला पाहिजे, असा सूर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा होता. त्यातूनच सावंत आणि नार्वेकर राज्यपालांच्या भेटीला गेले. खा. अरविंद सावंत यांनी आमची सदिच्छा भेट होती असे जरी सांगितले असले तरी ठाकरे यांच्या नियुक्तीचा विषय मुख्य होता, हे स्पष्ट होते. ठाकरे यांच्या नियुक्तीचा विषय पडद्याआड सामोपचाराने मिटवावा, अशी भूमिका मातोश्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचीही आहे.
मात्र, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्तेची मोट बांधण्यात सिंहाचा वाटा असणारे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माजी राज्यपालांवर केलेली टीका काहीशी नेतृत्वाला अडचणीची वाटू लागली आहे. संजय राऊत यांनी माजी राज्यपाल रामलाल यांचा संदर्भ देत टीका केली होती. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असे राऊत यांनी म्हटले होते. यामुळे शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये राऊतांविषयी नाराजी पसरली आहे. राऊत यांनी असे ट्वीट करण्याची ही वेळ नव्हती, अशी चर्चाही शिवसेनेत आहे.
एवढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. यानंतर मंगळवारी माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे