ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 - शिवसेनेच्या महाबळेश्वर येथील शिबिरात उद्धवजी ठाकरे यांची एकमताने कार्यकारी प्रमुख या पदावर निवड झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उद्धवज ठाकरेंनी शिवसेनेची सूत्रे अधिकृतपणे हलवण्यास सुरुवात केली. त्याआधी ते एक नेते म्हणून आपले योगदान देतच होते. विविध ठिकाणच्या महानगरपालिका, विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकांचे नियोजन उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे राबवले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युतीने विजयाची हॅट्ट्रिक साधीत विरोधकांना धोबीपछाड दिली.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना कार्यकारी प्रमुखपदी निवड झाली त्याआधी वर्षभरापूर्वी झालेली महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी कसोटीची होती. या निवडणुकीत शिवसेना विजयी झाली. त्यानंतर लगेचच राज्यभरात घेतलेल्या ‘चालते व्हा’ आंदोलनास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास होता.
‘आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही, मात्र अंगावर येतील त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली. उद्धव ठाकरेंवर विरोधकांकडून टीका केली जात असे, मात्र सर्वच आरोपांना उद्धव ठाकरे उत्तरे देत नव्हते, परंतु अत्यंत धीरोदात्तपणे ते शिवसेना पुढे नेण्याचे काम करीतच होते. शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत होता. त्यांच्या सभांची गर्दी शिवसेनाप्रमुखांप्रमाणे भरगच्च होऊ लागली. उद्धव ठाकरे एकही दिवस गप्प बसले नाहीत. आज विदर्भात तर उद्या मराठवाड्यात, परवा पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या सभा आणि प्रचार चालूच राहिला. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन आणि कामावरची निष्ठा याच बळावर उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढू लागली. मराठी माणसांवरचा अन्याय आणि हिंदुत्वावरचे प्रेम यामुळे साऱ्या महाराष्ट्रात त्यांना मागणी होऊ लागली.
शिवसेनाप्रमुखांच्या जशा जहाल मुलाखती दै. ‘सामना’मध्ये प्रकाशित होत असत, तशाच उद्धव ठाकरेंच्याही मुलाखती ‘सामना’मध्ये प्रकाशित होऊ लागल्या. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे आपली जबाबदारी पार पाडीत होते. सभा घेत होते. वातावरण तापवत होते. राष्ट्रद्रोह्यांना शिवसेनेचा वचक बसत होता. सौम्य आणि मवाळ उद्धवजी हळूहळू शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच जहाल वक्तव्य देऊ लागले होते. शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची जबरदस्त ताकद दाखविणारी घटना म्हणजे संभाजीनगर येथे झालेला धिक्कार मोर्चा. हा मोर्चा अतिविराट असाच होता. शिवसेनेच्या या मोर्चाने सरकारसुद्धा हादरून गेले. उद्धव ठाकरेंनी काही वेळा चिंतन मेळावेही घेतले. अशा मेळाव्यांद्वारे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ठाणे आणि अन्य ठिकाणच्या विजयाची सुरुवात या चिंतन मेळाव्यानेच झाली. शिवसेनेच्या एका प्रचंड जाहीर सभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. जवळपास १२०० शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन सुद्धा सरकार जागे होत नाही, याबद्दल त्यांनी टीका केली. महाराष्ट्र पेटला असताना डुलक्या काढणारा राजा काय कामाचा? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.
उद्धव ठाकरे अशा रीतीने हळूहळू आक्रमक होऊ लागले. शिवसेनाप्रमुखांनंतर हिंदुत्वाची बाजू प्रखरपणे मांडणारा म्हणून त्यांचे सर्वत्र नाव होऊ लागले. शांत, संयमी तरीही आक्रमक व रोखठोक अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. कमी व मोजकेच बोलणे, प्रसंगी आक्रमक होणे आणि अहोरात्र कामात राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. उद्धवजींच्या रूपाने शिवसेनेला एक मजबूत आधार मिळाला. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या रूपात महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि देशातील हिंदूंना खंबीर नेता मिळाला आहे.
शिवसेनेत मध्यंतरी काही नेत्यांनी बंडखोरी केली, तेव्हा शिवसेनेला हादरा बसेल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांना वाटत होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची या वेळी खरी कसोटी होती. मात्र या वेळी झालेल्या मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रचंड संघर्ष करून भगवा फडकावला. ठाणेकर आणि मुंबईकरांनी शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकून उद्धव ठाकरें नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. ‘ही उद्धवची करामत. हा भगव्याचा विजय आहे… आम्ही केवळ निमित्तमात्र,’ असे कौतुक त्या वेळी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. मुंबई, ठाणे आणि पुणे काय किंवा संपूर्ण महाराष्ट्र काय, शिवसेनेला वेळोवेळी जे यश मिळाले, त्या यशाची धनी व शिल्पकार मराठी जनताच आहे, असे उद्धवजी मानतात.
(सौजन्य - http://shivsena.org/m/)