भूमिका बदलली : एनडीएतून बाहेर पडणार नाही
मुंबई : केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा दिल्यास त्याचे श्रेय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जाईल म्हणून ‘आम्ही एनडीएतून बाहेर पडणार नाही,’ असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 तासांच्या आत घूमजाव केले.
राज ठाकरे यांनी कांदिवली येथील जाहीर सभेत महाराष्ट्रात युती तुटली तरी केंद्र व महापालिकेच्या सत्तेत शिवसेना सहभागी कशी, असा सवाल केला होता. अनंत गीते केंद्रीय अवजड उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा का देत नाहीत? असेही राज म्हणाले. लागलीच दुसरे दिवशी उद्धव यांनी पंतप्रधान मायदेशी परतल्यावर गीते राजीनामा देतील, असे स्पष्ट केले. मंगळवारी ठाकरे यांनी भूमिका पूर्णपणो बदलली. लोकसभा निवडणूक भाजपा-सेना एकत्र लढली असल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम काय होतील ते तपासून पाहावे लागेल, असे ते म्हणाले.
खात्रीलायक सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव यांनी त्यांच्या निकटवर्तीयांशी केलेल्या चर्चेत गीतेंच्या राजीनाम्याचे श्रेय विनाकारण राज यांना मिळू देऊ नका. कदाचित भाजपा व राज यांच्या साटय़ालोटय़ातून त्यांनी अशी भूमिका घेतली असेल, असे त्यांना सांगण्यात आल्याने त्यांनी भूमिका बदलली.