मुंबई : कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणाऱ्यांनी आधी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं. तिथं सत्ता कोणाची आहे ते आपल्याला माहित नाही, असे उपरोधिकपणे म्हणत ठाकरे म्हणाले की, मुंबईत एका दिवसात ३०० मि.मी. पाऊस होऊन पाणी तुंबले तर अनेकांना नालेसफाईची आठवण झाली. मात्र दिल्लीत केवळ १०० मि.मी. पाऊस होऊन दिल्ली तुंबली. दिल्लीत नाले आहेत की नाही ते मला माहित नाही. परंतु आता काहींना नालेसफाईची आठवण कशी झाली नाही, असा टोला उद्धव यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना लगावला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी महापालिका अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना उद्धव यांनी संबोधित केले. यावेळी पालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक, विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे. त्याला विरोध करायला तो काही दाऊदचा उत्सव नाही. त्याला ब्रिटिशांनीही विरोध केला नाही. गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार, हा मुर्दडांचा नाही तर जिवंत माणसांचा उत्सव आहे. तो दणक्यातच साजरा होणार, असा आदेश ठाकरे दिला.शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिली. मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींविरोधात खटले सुरू आहेत. त्याविरोधात न्यायालयात जावे असे कोणाला वाटत नाही. पण, आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का आणता, असा उद्गीग्न सवाल करतानाच शिवसेना पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. (विशेष प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे यांची शहा-पवारांवर शेरेबाजी
By admin | Published: July 13, 2015 1:20 AM