Sanjay Raut Shivsena UBT ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज महायुती आणि महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. आम्ही बंडखोर उमेदवारांशी चर्चा करत असून त्यांना समजावण्यात आम्हाला यश येईल, अशी आशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसंच आघाडी धर्म बाळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पेण, अलिबाग आणि पनवेल या जागा शेकापला सोडल्या आहेत, अशी माहितीही राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय राऊत म्हणाले की, "महायुतीत जसा गोंधळ सुरू आहे, तसा आमच्याकडे नाही. महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म दिले आहेत. तशी परिस्थिती आमच्याडे नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आघाडी धर्म पाळतील. आम्ही युतीत होतो तेव्हाही युतीचा धर्म पाळत होतो," अशा शब्दांत राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, अलिबाग, पेण आणि पनवेल या जागा जरी ठाकरेंच्या शिवसेनेनं शेकापला सोडल्या असल्या तरी सांगोल्याच्या जागेवर माघार घेणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
सांगोल्यात तिरंगी लढत
सांगोला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून शेकापला सुटणार म्हणत शेकापने डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करत 'मातोश्री'तून एबी फॉर्म मिळाल्याने सांगोल्याच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला असून आज अखेरच्या दिवसापर्यंतही हा तिढा सुटलेला नाही.