आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेने राज्यातील महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या गोटामधून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीमध्ये असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं वृत्त समोर येत असून, या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाठा पक्ष सर्वात मोठा भाऊ ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटपानुसार शिवसेना उबाठा २२ जागांवर निवडणूक लढणार असून, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर लढण्याची शक्यता आहे. या जागावाटपामध्ये महाविकास आघाडीने वंचितचा विचार केलेला नाही. मात्र वंचित सोबत आल्यास महाविकास आघाडी वंचितला चार जागा सोडू शकते.
जागावाटपाबाबत सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा पक्षाला ४८ पैकी २२ जागा देण्यात येतील. या २२ जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, नाशिक, जळगाव, शिर्डी, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले आणि सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. या जागावाटपात ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमधील ५ मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आले आहेत. तर हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गट राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तसेच सांगली मतदारसंघ ठाकरे गटाला देण्यात आला आहे.
तर काँग्रेसला या जागावाटपामध्ये १६ जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदूरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी चंद्रपूर मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास वरीलपैकी अकोला मतदारसंघ काँग्रेस पक्ष वंचितला देऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला १० जागा आल्या आहेत. त्यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी बारामती, सातारा आणि शिरूर या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. तर मागच्यावेळी जिंकलेला रायगड लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांनी ठाकरे गटाला सोडला आहे.