पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त बोलण्यापेक्षा काहीतरी कृती करायला पाहिजे. आणि त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणाबाजी असल्याचे मत व्यक्त करत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
पुण्यात शिवसंग्राम पक्षाच्या वतीने व विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण टिकवता आले नाही. तसेच जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान २० प्रमुख विभागांनी राबविलेल्या निवड प्रक्रियेतुन निवड झालेल्या जवळपास ४००० मराठा समाजातील उमेदवारांना आजपर्यंत नोकरीची संधी प्राप्त झालेली नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील ठराविक मंत्री व प्रशासकीय अधिकारी न्यायालयीन आदेशातील शब्दांचा चुकीचा अर्थ लावून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची दिशाभूल करत त्यांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचत आहे. आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे बळी पडत आहे, असेही मेटे यांनी यावेळी सांगितले.
..............
...... तर शिवसंग्राम पक्ष आझाद मैदानावर आंदोलन छेडणार
राज्य सरकारने लवकरात लवकर जर मराठा आरक्षण व तरुणांच्या नोकरीबाबत आश्वासक पावले टाकली नाही तर आम्ही राज्यपालांकडे याविषयी दाद मागणार आहोत. आणि तिथेही काही मार्ग निघाला नाही तर शिवसंग्राम पक्ष आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडणार आहे. आम्हाला अशोक चव्हाण यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. ते फक्त समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहे.
विनायक मेटे, शिवसंग्राम