नागपूर - उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना स्थगिती देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथून प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र किती प्रकल्पांना स्थगिती दिली ते तर सांगा. मुंबईतील आरे मेट्रो कारशेड वगळता कुठल्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. विकासकामांना स्थगिती दिल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. पण आम्ही किती विकासकामांना स्थगिती दिली हे तर सांगा ? आरे मेट्रो कारशेड वगळता राज्यातील एकही प्रकल्प स्थगित केलेला नाही. आरेमधील जैवविविधतेबाबत बरीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी ही स्थगिती देण्यात आलेली आहे.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
''स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही आमची भूमिका स्पष्ट आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण गोंधळ उडवा, तणावाखाली ठेवा, देशभरात परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.