उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 08:41 AM2020-01-16T08:41:04+5:302020-01-16T08:41:08+5:30
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीपेक्षा तिप्पट खर्च
मुंबई: उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर २.७९ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ठाकरेंसोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सोहळ्यावर नेमका किती खर्च झाला, याची आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनभट्टी यांनी मागितली होती.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहा मंत्र्यांच्या शपथविधीवर २.७९ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती चनभट्टी यांना मिळाली. यापैकी तीन लाख रुपये फुलांच्या सजावटीवर खर्च झाले. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यावर ९८.३७ लाख रुपयांचा खर्च आला होता. वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला होता. चनभट्टी यांनी माहिती अधिकार अर्जातून गेल्या १० वर्षांत विविध सरकारी कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी मागितली होती.
उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन ही नेते मंडळी उद्धव यांच्या शपथविधीला हजर होती.