पुणे/नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाकयुद्ध पेटले आहे. शनिवारी च्याचा प्रत्यय आला. मी कोणालाही, कसलेही आव्हान दिलेले नाही. ढेकणांना आव्हान देत नसतात, तर त्यांना चिरडून टाकतात, अशी तिखट भाषा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात वापरली तर उद्धव ठाकरे अत्यंत नैराश्यातून डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नागपुरात दिले.
‘एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी’ असे मी म्हणालोच. पुन्हा म्हणेन. मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आहे व तू म्हणजे महाराष्ट्र लुटणाऱ्या टोळीचा प्रमुख. यात मी कोणालाही, कसलेही आव्हान दिलेले नाही. ढेकणांना आव्हान देत नसतात, तर त्यांना चिरडून टाकतात. महाराष्ट्राने यांना लोकसभेत फटके दिले. त्याचे वळ मोजायला ते नुकतेच पुण्यात येऊन गेले. आता विधानसभेला इतके फटके बसतील की सगळी वळवळ संपून जाईल, असा घणाघात त्यांनी केला.
संघाचे हिंदुत्व तरी मान्य आहे की नाही?गणेश कला क्रीडा मंदिरात शनिवारी आयोजित संकल्प मेळाव्यात ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आमचे हिंदुत्व तर काढता; तर मग तुमच्या शामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगबरोबर युती केली होती तेही पहा, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, यांना संघाचे हिंदुत्व तरी मान्य आहे की नाही? ‘संघ नको’ असे आता म्हणतात. ‘बाळासाहेब देवरस यांनी केंद्र सरकारला काय पत्रे लिहिली होती ती वाचा,’ असे म्हणत ठाकरे यांनी त्या पत्रातील मजकुराचे वाचनही केले. पाऊस थांबल्यावर भगवे वादळ येणार आहे, असे ते म्हणाले.
तुम्ही तर अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशजमला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणता; मग तुम्ही तर अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहात, अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राचा स्वाभिमान तुडवणारा अब्दाली तुम्हाला हवाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्यच - उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यापुढे अब्दालीच म्हणणार, असे वक्तव्य केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा ताबा सुटलेला आहे. ते नैराश्यात अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत.
- जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या नैराश्यातून डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचे नसते. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत हे आता त्यांनी दाखवून दिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.