मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रिपद आणि सत्तास्थानांमधील समान वाटपावरून शिवसेना आणि भाजपा महायुतीचे सत्तास्थापनेचे घोडे अडले आहे. एकीकडे भाजपाने शिवसेनेला दुय्यम लेखण्याचा पवित्रा कायम ठेवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं कुणी समजू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी केलेल्या विधानामुळे चर्चेत खोडा घातला गेल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यावेळी उपस्थित आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप करण्याबाबत आडमुठी भूमिका घेणाऱ्या भाजपाला खडेबोल सुनावले. ''युतीची घोषणा करताना सत्तावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार अधिकारपदांचे वाटप व्हायला हवे. कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घातला आहे, असं समजू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली. दिवाळी दिवशी जे विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, ते योग्य नाही. तसं विधान त्यांनी करायला नको होतं. भाजपाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणार असून, आम्ही मित्र पक्षाला शत्रू मानत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंनी बैठकीत निवडून आलेल्या आमदारांचे अभिनंदन केले. खूप काही अफवा सुरू आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका.मीडियाच्या माध्यमातून काही प्रस्ताव सुरू आहेत. माझं जे अमित शाहांबरोबर ठरलंय ते करावं. आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळी दिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये ते वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटली, पण खात्री आहे, पुन्हा सुरळीत होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दिवाळीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला होता. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं अमित शहांनीही मला सांगितल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता. दरम्यान, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनंही आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड केली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.
कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 5:04 PM