ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर महापालिकेतील निवडणूक प्रचारामध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यावेळी सत्तेतील दोन्ही पक्षाचा शाब्दिक वाद चव्हाट्यावर आला होता. निवडणुकीनंतर दोघामधील शाब्दिक चकमक थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सुरुच असल्याचे दिसून येत आहे. एबीपी न्युजने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बातमी ट्विटरवर पोस्ट केली होती. त्या बातमीला रिपोस्ट करत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाजर असे लिहले. बातमीवर गाजर असे लिहीत त्यांनी भाजपावर एकप्रकारे टीकाच केली म्हणावे लागेल. बातमी मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने राज्य सरकारबद्दल खंत व्यक्त केली आहे. कुस्ती खेळण्यासाठी मी बाहेर जातो, त्यावेळी चाहते मला नोकरी मिळाली का? मुख्यमंत्र्यानी तुला नोकरी दिली का? हा प्रश्न विचारतातच, असं विजयने सांगितले आहे. या बातमीला पुन्हा रिपोस्ट करत उद्धव ठाकरें यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पारदर्शक कारभार दाखवून दिला असे म्हणावे लागेल. दरम्यान, मिनी विधानसेभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकरी संघटनेचे भाजपा विरोधात 'गाजर वाटा' आंदोलन केले होते. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही आश्वासने देऊन विजयाचे स्वप्न भाजपा पाहत आहे. पारदर्शकतेचे खोटे गाजर जनतेला दाखविले जात आहे. भाजपाने त्यांचे कमळाचे चिन्ह गोठवून गाजराचे चिन्ह ठेवावे, अशी टीका केली होती.