मुंबई : गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील उधना आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव यांना जोडणाऱ्या दुहेरी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले असून २२ एप्रिलपासून त्यावर वाहतूकही सुरू झाली आहे.सन २००९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेला ३०४ किमी अंतराचा रेल्वेमार्ग पश्चिम रेल्वेने २,४४६.८५ कोटी रुपये खर्च करून पूर्ण केले आहे. या रेल्वेमुळे त्या भागातील व्यापार-उदीम व विकासास चालना मिळेल.पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते रवींद्र भाकर यांनी सांगितले की, या दुहेरी रेल्वेमार्गावर एकूण ४४ स्थानके आहेत. ३८० पूल, ३१ पादचारी पूल (एफओबी), ६६ उंच पातळीचे फलाट, २४ मध्यम उंचीचे फलाट व सात रेल्वेमार्गाच्या समतल असलेले फलाट या कामाचा भाग म्हणून बांधण्यात आले आहेत. याखेरीज स्थानक निवारे, स्वच्छतागृहे, वेटिंग रूम्स अशा प्रवासी सुविधाही ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगल्याप्रकारे सोय होण्यास मदत होणार आहे.दुहेरी रेल्वेमार्गामुळे प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढण्याखेरीज गाड्यांचा वक्तशीरपणाही वाढेल, असे भाकर म्हणाले. या मार्गामुळे नंदूरबार, व्यारा, धरणगाव व मार्गावरील इतर ठिकाणांच्या विकासास गती मिळेल. शिवाय सध्या काम सुरू असलेल्या दिल्ली-मुंबई ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’लाही यामुळे उत्तर महाराष्ट्रातून जोडणी मिळेल.
उधना-जळगाव दुहेरी रेल्वेमार्ग पूर्ण ३०४ किमी अंतर, खर्च २,४४२ कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:41 AM