मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील उद्यान आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस आता लाल-करड्या रंगात दिसणार आहे. या दोन्ही एक्स्प्रेसला लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे एक्स्प्रेसची क्षमता, वेग वाढविण्यासाठी मदत होईल. यासह जानेवारीपासून डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.सीएसएमटी ते केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस आणि सीएसएमटी ते सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडले जाणार आहेत. एलएचबी या प्रकारातील डबे एक्स्प्रेसला जोडण्यात आले असल्याने आरामदायी प्रवास, एक्स्प्रेसची क्षमता, वेग, आसन क्षमता, दरवाजांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. यासह या एक्स्प्रेसमध्ये बायो-टॉयलेट्सची सुविधा असणार आहे.सीएसएमटी ते केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस २४ नोव्हेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत तर, केएसआर बंगळुरू ते सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस २५ नोव्हेंबर ते ४ जानेवारी, सीएसएमटी ते सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस २३ नोव्हेंबर ते २ जानेवारी आणि सोलापूर ते सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस २६ नोव्हेंबर ते १ जानेवारी या कालावधीत एलएचबी डबे जोडून धावणार आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३ जानेवारी सीएसएमटी ते सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, ४ जानेवारीपासून सीएसएमटी ते केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, ५ जानेवारीपासून केएसआर बंगळुरू ते सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस,६ जानेवारीपासून सोलापूर ते सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल होईल. या चारही एक्स्प्रेसच्या संरचनेत एक प्रथम श्रेणी एसी डबा, द्वितीय श्रेणी एसीचे तीन डबे, तृृतीय श्रेणी एसीचे तीन डबे, १० स्लीपर कोच, तीन सामान्य द्वितीय श्रेणी डबा, २ जनरेटर डबे याप्रमाणे असेल.
उद्यान, सिद्धेश्वर एक्स्प्रेस नव्या रंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 8:26 AM