मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) राज्य सरकारला दिलासा दिला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी यूजीसीनं राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. राज्यातील कोरोना संकटाचा विचार करता परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करून यूजीसीनं एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा विचार करता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. तसा निर्णयदेखील राज्य सरकारनं घेतला होता. मात्र अंतिम वर्षाची परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांतील कामगिरीच्या आधारे पदवी देण्याचा किंवा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय कायद्याला धरून नाही. परिणामी अंतिम परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच हे स्पष्ट झालं. मात्र राज्यातील सध्याची स्थिती पाहता सरकारनं यूजीसीकडे एक महिन्याची वाढीव मुदत मागितली. राज्य सरकारची ही विनंती यूजीसीनं मान्य केली. त्यामुळे आता ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येतील. परीक्षा घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना यूजीसीनं राज्य सरकारला केल्या आहेत.
महाराष्ट्राला दिलासा! यूजीसीकडून परीक्षा घेण्यास १ महिन्याची मुदतवाढ; राज्य सरकारची विनंती मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:10 PM