पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) येत्या आठ दिवसात राज्य शासनाला परीक्षांबाबत निर्देश दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी आणि कोणत्या पध्दतीने होणार यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावयाचा अहवाल देण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. ही समिती युजीसीकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार आपला अहवाल देणार आहे. 'यूजीसी'ने नियुक्त केलेल्या दोन्ही समितींनी त्यांचे अहवाल सादर केले आहेत. त्यात एका समितीने सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे तर दुसऱ्या समितीने पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात अन्यथा लॉकडाऊन संपण्याची वाट पहावी,अशी सूचना केली आहे. दरम्यान, राज्यात परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पुढील आठ दिवसात कळविले जाईल, असे यूजीसी'ने सांगितले आहे. त्यामुळे युजीसीचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल राज्यपाल व शासनाला सादर केल्यावर त्यावर चर्चा करून विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांबाबत घेतला जाणार आहे. ----------