ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.23 - उजनी धरणातून बुधवारी संध्याकाळी भीमा नदीपात्रात सोडलेले पाणी शुक्रवारी संध्याकाी ७ वाजता संगम येथे पोहोचले. उजनीतून सध्या भीमा नदीत ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तासी १ कि.मी. वेगाने हे पाणी वाहत आहे. उजनी धरण ते औज बंधारा २०० कि.मी. अंतर असून पात्रातील पाण्याचा वेग कमी असल्याने सोलापूरला पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे.
सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराबरोबर शिरभावी पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सायं. ५ वाजता १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. या पाण्यामध्ये वाढ करून गुरूवारी १५०० क्युसेक्सने वाढ करण्यात आली. त्यामध्ये सध्या भीमा नदी पात्रातून ३१०० क्युसेक्सने पाणी वाहत आहे. हे पाणी शुक्रवारी संध्याकाळी ७ वा. माळशिरस तालुक्यातील संगम येथे पोहोचले आहे.
सध्या उजनीतून ३१०० क्युसेक्स, कालवा २००० क्युसेक्स, बोगदा ९०० क्युसेक्स असे पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याला ताशी १ कि.मी. वेग आहे. नदी पात्रात वाळू चोरीमुळे मोठे खड्डे पडल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे. उजनीतून डाव्या कॅनॉलला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र कॅनॉलला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने कॅनॉलमधील सुमारे ५०० क्युसेक्स पाणीही भीमा नदी पात्रात मिसळत आहे.
उजनी धरण भरले असले तरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी समाधानी असल्याचे दिसत नाही. उजनीतून पाणी सोडण्याचे एक रोटेशन वाचले तर पाच कोटी रूपये वाचतात. परंतु सध्या उजनीच्या डाव्या कॅनॉलला लिकेज मोठ्या प्रमाणात घेऊनही याकडे अधिकाºयांचे लक्ष नाही. परंतु वसुली होत नसल्याने महिन्याच्या पगारीची काळजी मात्र सुरू झाली आहे.