भीमानगर : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात बुधवारी, गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने उजनी धरणात येणारा विसर्ग घटला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने विसर्ग वाढला असून उजनीची टक्केवारी आता मंद गतीने वाढताना दिसून येत आहे. उजनी धरण ३३ टक्के झाले असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती व उद्योग क्षेत्राला ऊर्जा मिळाली आहे.
दरम्यान, आॅगस्ट महिन्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असून यामुळे उजनी धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. मायनस ५९.८८ वरून आज उजनी धरण प्लस ३३ टक्के झाले आहे. २० जुलै रोजी धरणात वजा २८ टक्के पाणीसाठा होता. १२ दिवसात ५८ टक्के पाणी धरणात आले.
परंतु अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, जिरायत भागात पावसाशिवाय पर्याय नाही. नीरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असून यामुळे सोलापूर जिल्ह्याला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. उजनीत झपाट्याने पाणी वाढ झाल्यामुळे उजनी जलाशय परिसरात व नदीकाठच्या गावांमध्ये शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे. हा भाग ऊस क्षेत्राचा पट्टा म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, उजनीची सद्यस्थिती एकूण पाणीपातळी ४९३.३१० मीटर, एकूण पाणीसाठा २३०३.६० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५००.७० दलघमी अन् टक्केवारी प्लस ३३.०१ वर गेली आहे. सद्यस्थितीला दौंडमधून ४०५१० क्युसेक विसर्ग असल्याचे सांगण्यात आले.