देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) च्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरणाच्या नवीन पाणी परवाने तात्पुरते स्वरूपात बंद केल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता ए.पी. सोनेवार यांनी दिली.दौंड तालुक्यातील पूर्व भागातील आलेगाव ते खानवटे पर्यंतच्या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन पाणी परवानगी व जुने पाणी परवाने नूतनीकरण सोलापूर जिल्हाधिकारी यांनी उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने हे पाणी जनावरे व माणसांसाठी राखून ठेवण्यात आल्याने गेल्या वर्षी परवाने देण्याचे बंद केले होते. परंतु धरण भरल्यानंतर नवीन व जुन्या परवान्यावरची बंदी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली होती. परंतु काही महिन्यांतच उजनी धरण व्यवस्थापन विभागाने परवाने देण्याचे बंद केल्याने शेतकरी दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारण जुन्या पाणी परवानगीच्या मुदती २0१२/१३ संपल्या आहेत व नवीन पाणी परवाने उजनी धरण व्यवस्थापन विभाग देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बँका मध्यम मुदतीची कर्जे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परंतु या भागातील उजनी धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. दौंड तालुक्यात उजनी धरणासाठी या गावातील २२३ हे.९३ आर एवढी जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उजनी धरणाचेच पाणी परवाने घ्यावे लागत आहेत. पंधराशे हेक्टर जमिनीला दौंड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नवीन पाणी परवाने देणे बंधनकारक असतानाही या भागातील शेतकऱ्यांना जाणूनबुजून नाहक त्रास दिला जातो, अशी तक्रार येथील शेतकरी करत आहेत.>तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती...उजनीतील पाण्याने भिजणाऱ्या क्षेत्राच्या जुळवणीनंतर नवीन पाणी परवानगीवर तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे, ती उठवली जाईल.- ए. पी. सोनेवार, कार्यकारी अभियंता, उजनी पाणी व्यवस्थापन विभाग, भीमानगर, इंदापूर
उजनी धरणाच्या पाण्याचे परवाने तात्पुरते रद्द
By admin | Published: March 03, 2017 1:08 AM