ऑनलाइन लोकमतकरमाळा, दि. २९ : दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढे करूनही पाणी मिळत नसल्याने ते हताश बनले असून, चक्क उजनी काठावरील शेती उजाड बनली आहे.मागील दशकात २००२ नंतर २०१२ ते २०१४ अशी सलग तीन वर्षे व यंदा धरणातील पाणीपातळी सर्वाधिक खालावली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुध्दा उजनी काठावरील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत़ धरणातील पाणी दररोज कमी होत चालल्याने लाखो रूपये खर्चून लांब चर खोदून चारीतील पाणी विद्युतपंपाच्या सहाय्याने खेचून उभ्या पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील कंदर, वांगी, भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण, केत्तूर, पारेवाडी, सोगाव, पांगरे, सांगवी, वाशिंबे, उम्रड, के डगाव, शेटफळ, टाकळी, कोंढारचिंचोली, रामवाडी, उंदरगाव, मांजरगाव या धरण काठावरील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नदीपात्रात कालव्यासारखी चर खोदून तेथून विद्युतपंपाव्दारे पाणी उपसा सुरू केला आहे. विद्युतपंप व पाईपलाईनचे जाळे सर्वत्र दिसून येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची खालावल्याने पाणीपुरवठा योजनावर परिणाम झाला आहे. सोलापूर, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळासह ७१ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील ४१६ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. यामुळे हाल होत आहेत.पाण्याच्या नियोजनाची गरजउजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी त्याग केला. पण धरणातील पाणी शेतीला तर सोडाच पिण्यासाठीसुध्दा मिळत नाही. उजनी धरणातील पाणी वाटपाचे नियोजन करणे गरजेचे असून, करमाळा तालुक्यासाठी धरणातील हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असे उजनी धरण पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले.