भीमानगर : रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २७ हजार २०३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे.
२० आॅगस्टपासून पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीत पावसाने विश्रांती घेतल्याने बंडगार्डन व दौंडमधून येणारा विसर्ग जवळपास १२०० क्युसेकवरती आला होता, परंतु मंगळवारी व बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, त्यात ११ वाजता ७ हजार ७०६ क्युसेक, पहाटे २ वाजता १३ हजार ९८२, पहाटे ४ वाजता १८ हजार ४९२, पहाटे ५ वाजता २२ हजार ८८१ क्युसेक एवढे पाणी सोडण्यात आले होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा एकदा शिवणे-नांदेड पूल आणि पहाटे साडेचार वाजता डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली गेला; मात्र वरसगाव आणि पानशेत धरणातून सोडण्यात आलेले पाणी खडकवासला धरणात येत असल्याने खडकवासला धरणाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता २७ हजार २०४ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर मुळशी धरणातून सकाळी ८ वाजता १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले .तर सायंकाळी बंडगार्डन येथून ४८८०० क्युसेक विसर्ग उजनीत येतोय.
पुणे जिल्ह्यातील धरणातून येणाºया मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे उजनी धरणातून पुन्हा भीमा नदीत २ हजार व वीजनिर्मिती १६०० असे ३६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी भीमानदीच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर वीरमधून नीरानदीत ३२५०० क्युसेकने विसर्ग सुरू असून नीरेच्या व भीमेच्या पाण्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उजनीची सद्यस्थिती- एकूण पाणी पातळी ४९७.०० मी.- एकूण पाणीसाठा ३३७७.४६ दलघमी- उपयुक्त पाणीसाठा १५७४.६५ दलघमी- टक्केवारी १०४ %
उजनीत विसर्ग- बंडगार्डन ४८८००- दौंडमधून ५४७०
उजनीमधून विसर्ग- भीमानदी २०००- वीजनिर्मिती १६००- कालवा ३१५०- बोगदा १२००- वीरमधून नीरेत ३२५००