उल्हासनगर - सप्टेंबर महिन्याच्या महापालिका महासभेला चक्क जानेवारी महिना उजाडूनही कामकाज संपेनासे झाले. शनिवारी तरी महासभेचे कामकाज पूर्ण होणार का? असा प्रश्न विचारला जात असून महापालिका प्रशासन व सत्ताधा-यांच्या दिरंगाईने कळस गाठल्याची टीका शहरातून होत आहे.
उल्हासनगर महापालिका महासभेच्या कामाकाजात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरसेवक ढवळाढवळ, गोंधळ करत असल्याने, अनेक महासभा कामकाजविना स्थगित करण्याची वेळ महापौरांवर आली. महासभेतील नगरसेवकांचा गोंधळ व दिरंगाईचा फटका शहर विकासाला बसत असून विकास कामे ठप्प पडली आहे. महापौर मीना आयलानी यांनी 15 सप्टेंबर रोजी बोलवलेल्या महासभेत गोंधळ व गदारोळ झाला होता. अखेर महापौरांनी सर्वसंमतीने महासभा स्थगित करून 9 ऑक्टोबर रोजी बोलाविली. पुन्हा गोंधळ उडाल्याने, महासभा स्थगित करून, सर्वसंमतीने 31 ऑक्टोबर रोजी बोलाविली. असे करता करता महासभेला चक्क जानेवारी महिणा उजाडला आहे.
15 सप्टेंबर रोजी बोलाविलेली महासभा, 9 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 18 नोंव्हेबर, 18 डिसेंबर व 20 जानेवारीपर्यंत पुन्हा पुन्हा स्थगित केली. एकाच महासभेच्या कामकाजाला जर अर्ध वर्ष लागत असेलतर, महापालिकेचे कामकाज कोणत्या पद्धतीचे चालते? याचा प्रत्येय शहरवासियांना आला आहे. 15 सप्टेंबरची महासभा सहावी वेळा शनिवारी 20 जानेवारीला दुपारी 3 वाजता होणार आहे. यावेळी तरी महासभेचे कामकाज पूर्ण होणार की, पुन्हा स्थगित केली जाणार. आदी बाबत पालिका वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महापौर मीना आयलानी यांनी मात्र स्थगित महासभेचे कामकामज पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.