उल्हासनगर :
कॅम्प नं-३ मधील साई सदन इमारतीची गॅलरी (सज्जा) शेजारील घरावर पडून ६० वर्षाच्या गाबरा यांचा मृत्यू झाला तर त्यांची धर्मपत्नी गंभीर जखमी झाली. महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देवून सुरक्षाचा उपाय म्हणून इमारत खाली केली.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब व सज्जे पडण्याचे सत्र सुरू असून यामध्ये अनेकांचे बळी गेले. रविवारी सकाळी साडे आठ वाजता साई सदन इमारतीचा सज्जा शेजारील गोपाळदास गाबरा यांच्या घरावर पडून वृद्ध गाबरा दांपत्य जखमी झाले. शेजारील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेऊन घटनेची माहिती महापालिका आपत्कालीन कक्षाला दिली. सहायक आयुक्त गणेश शिंपी व दत्तात्रय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षेचा उपाय म्हणून साई सदन इमारत व शेजारील घरे रिकामी केले. तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घटनास्थळी भेट घेऊन घटनेचा आढावा घेवून सूचना दिल्या. दरम्यान जखमी झालेले गोपाळदास गाबरा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
याप्रकारने पुन्हा शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात धोकादायक इमारतीचे पुनर्बांधणी प्रकरणी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल आला असल्याचे सांगून त्वरित जीआर काढणार असल्याचे सांगितले आहे. शहरात धोकादायक व जुन्या इमारतीची संख्या मोठी असून त्याच्या दुरुस्तीची आवशक्यता असल्याचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले. चौकट संततधार पावसाने जुन्या इमारतीच्या धोक्यात वाढ संततधार पावसामुळे जुन्या व धोकादायक घोषित केलेल्या इमारती ढिसुळ होत असल्यानें अपघाताची शक्यता वाढली. असे मत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. नागरिकांनी स्वतःहून जुन्या व धोकादायक इमारतीची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मत लेंगरेकर यांनी व्यक्त केले.